स्त्री ही जोपर्यंत तिच्याकडे बघण्याची पुरूषाची
नजर चांगली होत नाही तोपर्यंत या जगामध्ये सुरक्षित राहू शकत नाही म्हणूनच “आमची मुंबई, 'सुरक्षित' मुंबई आहे का..?” असा प्रश्न मला पडतच नाही पण मुंबई आणि इतर
ठिकाणीदेखील कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त
घराबाहेर उशीरापर्यंत किंवा उशीर न करता असणा-या मुलीी, तरूणी, महिला सुरक्षित आहेत का..?तर याचं उत्तर नाही असंच आहे.
तसे तर
घराबाहेर पडणा-या
प्रत्येक मुलीला ती असुरक्षित आहे याचा
अनुभव हा कधी न कधी येतच असतो त्याला मीही अपवाद नाही पण मला अशा परिस्थितीला
सामोरे जायची वेळ येते तेव्हा मी मला काही करणा-या व्यक्तीला तेव्हाच धडा शिकवते.
आजचाच
प्रसंग सांगते.
आज मी
कलिनाला नाटकाच्या रिहर्सलला जाण्यासाठी कुर्ल्याला उतरले. नेहेमीप्रमाणे
प्लॅटफॉर्म क्र.१ च्या बाहेर पडून गणपती मंदिराच्या शेजारी असणा-या कपडे
विक्रेत्यांच्या समोरच्या चिंचोळ्या रस्त्यावरून बस क्र.३१८ च्या दिशेने निघाले.या
चिंचोळ्या रस्त्याचा मला वैताग येतो कारण इथे टॅक्सी, छोटे - मोठे विक्रेते आणि
माणसांची गर्दी नेहेमी असते.बरं कुर्ल्याला कलिनामध्ये मी गेल्या ३ वर्षांपासून शिक्षणासाठी
जात आहे.कलिना तर माझं माहेरघर आहे असंही मी ब-याचदा सांगत असते. या ठिकाणी कधीही
मला असुरक्षित परिस्थितीशी सामना करायची वेळ आली नाही याचं मला आजपर्यंत चांगलं वाटत आलेलं
आहे पण आज मात्र वेळ उलटी फिरली.
मी त्या गल्लीतून जात असताना माझ्यामागून एक
गब्बरसिंग इतका जाडा माणूस मला डाव्या खांद्याला धक्का मारून पुढे निघून गेला.
माझ्या डाव्या खांद्यावर सॅक असल्याने त्याचा स्पर्श मला झालाच नाही.मग हा जाडा माणूस माझ्यापुढे फोनवर बोलत चालणा-या मुलीच्या उजव्या
कमरेखाली हात मारून तिच्या पुढे गेला आणि पुढून तिच्या तोंडाकडे बघत दोनदा तिच्याच
उजव्या कमरेखाली हात मारून तिच्या पुढे गेला.इतकं ह्या माणसाने तिला असं करून तिने
त्याला काहीच केलं नाही.माझी मात्र जाम सटकली.
मग ह्या माणसाने सरळ मागे माझ्या दिशेने येऊन
माझ्या उजव्या मांडीला हात मारला.आता मग माझी असली सटकली की मी सरळ त्याला एक
जोरात पाठीवर ठेऊन दिली मग त्याने माझ्याकडे इतक्या रागाने वळून पाहिलं की मी
घाबरलेच तरीही पुन्हा त्याच्या डाव्या दंडावर मी जोरात ठेऊन दिली आणि शेजारून
जाणा-या लोकांकडे बघून जोरजोरात “मारो ईसको , मारो ईसको ” , असं म्हणत जवळ आलेल्या ४ कपडे विक्रेत्यांना झाला प्रकार सांगितला.तर एका कपडे
विक्रेत्यानेच फक्त “ क्या भाई ऐसे
करते है क्या लडकिको ?” असं
त्याला म्हणायची तात्काळ हिंम्मत केली.बाकीच्या लोकांनी काही बोलायचे सोडाच पण
फक्त थांबायचीही तसदी घेतली नाही.अशा धुक्यात हरवत जगणा-या माणसांचा मला खूप
राग येतो.
मग तो
माझ्याकडे खूप रागाने बघत निघून गेला.पण तो ज्या जळजळीत नजरेने माझ्याकडे बघत होता तेव्हा मला वाटलं की आत्ताच्या आत्ता
ह्याने माझ्यावर रेप केला असता तर ???
मग मी
शक्य तितक्या वेगाने पुढे जात त्या मघाच्या ३ धक्के खाल्लेल्या नालायक पोरीला
शोधलं पण ती कुठे गायब झाली काय समजलंच नाही.मान्य आहे की अशा प्रसंगी मुली
घाबरतात पण एकदा जर तिने त्याच्याकडे रागाने पाहिलं असतं तर बरं झालं असतं.
आता
मला कलिनाला जाताना हीच भिती सारखी वाटत राहणार की तो मला पुन्हा भेटला आणि त्याने
काही केलं तर ???
म्हणूनच मी पुन्हा हेच म्हणेन की स्त्री ही
जोपर्यंत तिच्याकडे बघण्याची पुरूषाची नजर चांगली होत नाही तोपर्यंत या जगामध्ये
सुरक्षित राहू शकत नाही.म्हणूनच आमची मुंबई, 'सुरक्षित' मुंबई आहे का..? असा प्रश्न मला पडतच नाही पण मुंबई आणि
इतर ठिकाणीदेखील कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त
घराबाहेर उशीरापर्यंत किंवा उशीर न करता असणा-या मुली, तरूणी, महिला सुरक्षित आहेत का..?तर याचं उत्तर नाही असंच आहे.
जेव्हा पिडीत स्त्री स्वत: तात्काळ प्रतिकार करेल आणि
तिला तात्काळ आजुबाजूचे लोक मदत करायला धावून येतील हे असं चित्र वारंवार घडू लागेल तर
आणि तरच आमची मुंबई आणि इतर जग 'सुरक्षित' होऊ शकेल अन्यथा नाही.