बाहेर आभाळ नुस्तंच भरून आलंय
कुंद भवताल, गरम वारा
सगळी साली घामाची चिकचिक !
मरगळ भरून राहिलीय सगळीकडे.
तगमग… तगमग… असह्य
तडफड… उद्वेग… चिडचिड
कशाचा राग, कशाचा संताप ?
काहीच कळत नाही.
काय करू मी ?
काय
करू ?
या घालमेलीतून मोकळं व्हायचंय मला
बाहेर ते आभाळ अन् आत हे मन
साले छळताहेत नुस्ते मला
मोठमोठ्याने ओरडावं, रडावं
पण भरवस्तीत ते अशक्य !
ही सततची जीवघेणी घालमेल….
ही अस्वस्थतेची टांगती तलवार….
मी कशाची वाट
पाहतेय ?
काय आहे जे मिळाल्याशिवाय चैन पडत नाहीये ?
कोण आहे ते अनामिक ?
who ? who yaar …. damn
it!
टप्प ….टप्प…. एक…. दोन…. टप्प…. तीन
परत टप्प !
आणि असंख्य टप …. टप …. टप …. टप !
बाहेर आभाळ टपकू लागलेलं !
हळूच एक झुळूक, पुन्हा झुळूक
पाहता ….पाहता….
अवघडलेलं सगळंच
सैलावत जातं….
आणि मी भिजू लागते,
पावसांच्या धारांत
अंतर्बाह्य !
-
प्रतिमा संजीवनी
हंस दिवाळीअंक २००९
हंस दिवाळीअंक २००९
No comments:
Post a Comment